भांडण

संध्याकाळी सहाची वेळ. मी नेहमीप्रमाणे  शिवाजीनगर ला फिरायला आलो होतो. रविवार असल्यामुळे गर्दी भरपूर होती. चारही बाजूंनी ट्रॅफिक जॅम. या कोलाहलातच बाजूनं मोठमोठ्यानं आवाज येत होता. तशी मनात उत्सुकता होती,काय झालंय ते पाहण्याची. थोडं पुढं जाऊन पाहिलं, तर २०-२५ जणांची गर्दी जमलेली होती. त्यामधून आवाज मोठमोठ्यानं व आता स्पष्टच येत होता. गर्दीला बाजूला सारत आतमध्ये गेलो.गर्दीच्या मध्यभागी रिक्षा होती. त्यातील दोन व्यक्ती भांडताना दिसत होत्या. थोडं पुढं जाऊन पाहिलं, तर एक पुरुष आणि स्त्री यांच्यात भांडण चालू होतं. पुरुष त्याच्या बोलण्यावरून दारू प्यायलेला वाटत होता. मोठमोठ्या आवाजात तो त्या स्त्रीला शिव्या देत होता. हात उगारत होता. तसं भांडण एकतर्फी होतं. कारण ती स्त्री काहीही प्रतिकार करत नव्हती. मात्र, दयेची याचना करत होती. गर्दीतील कोणीतरी मोठ्यानं बोललं, ‘‘अरे ते दोघं नवरा-बायको आहेत.’’ मग आपल्याकडे अशी भांडणं होतंच असतात. तो तिच्यावर शिव्यांचा भडिमार करत होता. मधूनमधून २-३ चापट्या तिच्या तोंडावर लावत होता.तरी ती प्रतिकार करत नव्हती. गर्दीतून कोणीतरी पुढं येईल, आपल्याला नवऱ्याच्या कचाट्यातून वाचवेल, अशी तिची अपेक्षा असावी. पण पुढं जाण्याची जोखीम कोणीच पत्करत नव्हतं. उलट बघ्यांची गर्दी वाढत होती. येणारे जाणारे गाडी थांबवीत, काय चाललंय विचारीत, अन्‌ निघून जात. त्याचा मात्र शिव्यांचा आणि हाताचा भडिमार चालूच होता.अशातच साठीच्या आजीबाई पुढे आल्या. त्या पुरुषाला रोखण्याचा प्रयत्न करू लागल्या. दोन खडे बोलही सुनावले. तो असाकाही त्या आजीवर धावून आला, की तो आता आजीलाच मारतो की काय, असं वाटू लागलं. पण त्यानंसक्त ताकीदच दिली, की ‘आमच्यादोघांच्या भांडणात पडाल तर याद राख! गाठ माझ्याशी आहे.’ त्या फिल्मी डायलॉगनं आजीबाईही मागे सरकल्या. ते दोघं ज्या रिक्षात बसले होते, त्या रिक्षावाल्यांचा व्यवसाय असावा. तेसुद्धा कोणतीच जोखीम स्वीकारत नव्हते. तेवढ्यात दोघे पोलिस मोटारसायकलवरून तिथून जात होते. कोणीतरी हाक मारली म्हणून थांबले. त्यांनी बघ्यांकडेच विचारपूस केली आणि ‘आमची ड्यूटी संपली’ असं सांगत निघून गेले. जाता जाता पोलिस चौकीला फोन करतो म्हणाले; पण कोणीच आलं नाही. परिणामी त्याच्या आवाजात  वेगळाच संचार आला होता. तो तिला जोरजोरानं मारत होता. कारण त्याला विचारणारं कोणीच नव्हतं.गर्दी अजून वाढायला लागली म्हणून कदाचित तो तिला काहीतरी ताकीद देऊन निघून गेला. शेवटचे शब्द ऐकू आले- ‘‘याद राख!’’ थोडी गर्दी पांगली. गर्दीतील स्त्रिया तिच्याभोवती जमल्या होत्या. तो का मारत होता, म्हणून विचारत होत्या.पण आता काय साध्य होणार होतं?ती स्त्री जेव्हा अत्याचाराला बळी पडत होती, तेव्हा समाजानं बघ्याची भूमिका घेतली. अत्याचार झाल्यावर मात्र सहानुभूतीसाठी सगळेच पुढे सरसावले होते. आपला समाज खरंच का एवढा असंवेदनशील बनतचालला आहे. अधिक स्वार्थी, संकुचित, कातडीबचाव वृत्तीचा होत चालला आहे. मीपणा मिरवत आत्मकेंद्री बनत आहे. तसं पाहिलं तर त्या बघ्यांत स्त्रियासुद्धा होत्या. त्यासुद्धा पुढं सरसावल्या नाहीत याचंच  आश्चर्य वाटतं.आज जो तिचा नवरा समाजापुढं तिला मारायला घाबरत नव्हता, तो घरात तिचा काय छळ करीत असेल, ही कल्पना  केलेली बरी. पण प्रश्न असा पडतोकी हुंडाबंदी, घरगुती हिंसाचार प्रतिबंध यांसारखे कायदे करून काहीही फरक पडणार नाही का?

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s